काँग्रेसकडून महाराष्ट्र्रातील दुसरी यादी जाहीर; गडकरींविरोधात ‘हा’ उमेदवार रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) काँग्रेसने महाराष्ट्र्रातील दुसरी उमेदवार (Congress Candidates List) यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशभरातील एकूण ४६ जागांचा समावेश असून महाराष्ट्रातील ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये रामटेक मध्ये रश्मी बर्वे, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे, नागपूर मधून विकास ठाकरे आणि गडचिरोली येथून नामदेव किरसान याना काँग्रेसने तिकीट दिले आहे.

राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. मात्र मतदानाच्या तारखा जाहीर होऊनही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आपल्या उमेदवारांची नावे अजून जाहीर केली नाहीत. परंतु, असे असले तरीही काँग्रेसने मात्र दुसऱ्यांदा उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर मधून विकास ठाकरे याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. नागपूर महापालिकेचे माजी महापौर असलेल्या ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकर देशमुख यांचा पराभव केला होता. ते नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यामुळे विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांच्या रूपाने नागपुरात गडकरींना तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे.

यापूर्वी, २१ मार्च रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून ५७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश होता. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे, लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजीराव काळगे, नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी, अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे, नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर उमेदवारी देण्यात आली आहे. आता यात आणखी ४ नावांची भर पडली आहे.