ठाणे प्रतिनिधी । गुरुवारी झालेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी मतदान करून निवडून दिल्याने काँग्रेसचे बंडखोर इम्रानवली खान यांच्या गळ्यात उप महापौर पदाची माळ गळ्यात पडली. आता यानंतर काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी थेट ठाणे गाठत पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा बनावट व्हीप काढून तो वृत्तपत्रात जाहीर केल्याने याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. सोबतच ‘त्या’ १८ नगरसेवकांचे सदस्यपद रद्द करण्याचे आदेश देखील प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
दरम्यान प्रतिभा पाटिल यांना एकूण ४९ मतं मिळाली होती तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या रिषिका राका यांना ४१ मतं मिळाली होती. तसेच काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता. तसेच उपमहापौर पदी निवड झालेल्या इमरानवल्ली यांना एकूण ४९ मतं मिळाली तर शिवसेनेचे बालाराम मधुकर चौधरी यांना ४१ मतं मिळाले होती.