कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी निधन झाले. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख होती. उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी केवळ पंधरा दिवस काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2019 साली त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. अतिशय मनमिळावू आणि लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सगळ्यांचे लाडके आण्णा म्हणून ते परिचित होते.राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात ते अधिक व्यस्त असत.