कोल्हापूर प्रतिनिधी । सत्तास्थापनेचा संघर्ष सुरू असताना काँग्रेसचे आमदार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या काँग्रेस कमिटीत येऊन मतदार संघाचा आढावा आणि इतर कामकाजाला सुरवात केली आहे. राज्यातील चालू राजकीय घडामोडीवर सुद्धा कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून जयपूर, मुंबई दौऱ्यानंतर आता काँग्रेस आमदारांची कोल्हापूरात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान ‘जरी सत्तासंघर्ष सुरू असला तरी आम्ही आमच्या मतदारसंघातील कामाला सुरुवात केली आहे. महापुरानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात अजूनही मदत पोहचली नाही. ही मदत मिळावी यासाठी राष्ट्रपती राजवट असल्याने अधिकारी स्तरावर प्रयत्न सुरू केले असल्याचे’ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी’ यांची युती होत असताना महाराष्ट्रात स्थिर सरकार येईल आणि ते पाच वर्षे टिकेल’ असा दावा देखील त्यांनी केला आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार कोणत्याही परिस्थितीत फुटणार नसून हे भाजपने सोडलेले पिल्लू असल्याचं’ सतेज म्हणाले आहे.