कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
काँग्रेसच्या सातारा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष (विधानसभा मतदारसंघ) व शहराध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडीत कराड उत्तरच्या अध्यक्षपदी निवास आत्माराम थोरात तर कराड शहर अध्यक्षपदी ऋतुराज बापूसाहेब मोरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिली आहे.
कराड पालिका निवडणुका लक्षात घेऊन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शहराध्यक्षपदी ऋतुराज मोरे निवड जाहीर केली आहे. यापूर्वी श्री. मोरे यांनी संघटनात्मक पातळीवर केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांनी निवड झाल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. यापूर्वीचे शहराध्यक्ष व नगरसवेक अप्पा माने यांचा कार्यकाळ संपल्याने श्री. मोरे यांची निवड झाली आहे. आमदार चव्हाण यांच्या हस्ते आज (सोमवारी) श्री. मोरे यांचा सत्कार होणार आहे. त्या वेळी त्यांनी नियुक्तिपत्रही देण्यात येणार आहे. नगरसेवक श्री. माने यांनीही शहराध्यक्षपदी काम केले. त्यासोबत त्यांनी पालिकेत चांगले काम केले आहे. त्यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नव्या निवडी जाहीर केले आहेत. त्यात ऋतुराज मोरे यांचे नाव जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचे ऋतुराज लहान बंधू आहेत. त्यांचे वडील बापूसाहेब मोरे नगरसवेक होते. तर त्याच्या आजीही नगरसेविका होत्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या बालेकिल्यात चांगले काॅंग्रेस पक्षाचे संघटन केले आहे. तसेच सर्वसामान्य लोकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहचविल्या आहेत. कराड उत्तरमध्ये दांडगा जनसंपर्क असणारे निवास थोरात यांची कराड उत्तर अध्यक्षपदी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील अध्यक्षपदांची निवडी पुढीलप्रमाणे
सातारा शहर – रजनी दीपक पवार, सातारा ग्रामीण- संदीप प्रल्हाद चव्हाण, फलटण ग्रामीण- महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण शहर- पंकज चंद्रकांत पवार, खंडाळा- सरफराज समशुद्दीन बागवान, वाई- कल्याण दादासाहेब पिसाळ, महाबळेश्वर- नंदकुमार किसन बावलेकर, जावळी- संदीप प्रकाश माने, कोरेगाव- श्रीकांत चव्हाण, खटाव- संतोष गोडसे, माण- बाळासाहेब माने, पाटण- अभिजीत हिंदुराव पाटील, कराड- दक्षिण मनोहर भास्करराव शिंदे, कराड उत्तर- निवास आत्माराम थोरात, कराड शहर- ऋतुराज बापूसाहेब मोरे




