हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी बघायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू भविष्यातील राजकारणात सुद्धा एकत्र राहण्याची शक्यता आहे. परंतु उद्धव ठाकरे हे आधीच महाविकास आघाडीत असल्याने राज आणि उद्धव एकत्र कसे येणार? कि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेऊन येणार याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहे. नुकताच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा पार पडला असून त्यावेळी राज ठाकरेंबाबत बोलणं झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाविकास आघाडीसोबत जाणार का? याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथला यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या तरी राज ठाकरे आमच्या आघाडीत नाहीत असं त्यांनी म्हंटल आहे.
आज रमेश चैनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप होत आहे. या कार्यशाळेत बोलताना चैनिथला यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, नसीम खान, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती.
रमेश चैनिथला म्हणाले, दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काहीही अडचण नाही. परंतु सध्या तरी राज ठाकरे आमच्या आघाडीत नाहीत. तसेच आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा होऊ ही शकणार नाही. आघाडीबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ असे म्हणत रमेश चैनिथला यांनी खळबळ उडवून दिली आहे. चैनिथला यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडी तुटणार किंवा काँग्रेस स्वबळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार का? या चर्चांना जोर आला आहे.
यावेळी त्यांनी महायुती सरकारही टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी आहे, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्यांनी अजून कर्जमाफी केली नाही अस रमेश चैनिथला यांनी म्हंटल. तसेच सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. लवकरात लवकर निवडणुकीच्या घोषणा केल्या पाहिजे, अशी मागणीही चैनिथला यांनी केली.




