राष्ट्रवादीचे स्थानिक नेते निष्क्रीय ; महाबळेश्वरमधील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना काँग्रेस देणार मदतीचा हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | निसर्ग चक्रीवादळात महाबळेश्वर तालुक्यातील ४७ गावातील १९४ घराची पडझड झाली. शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरता युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाबळेश्वर तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळाने ग्रस्त लोकांना मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या सूचनेची तात्काळ अंमलबजावणी होऊन १९४ शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार असल्याची माहीती विराज शिंदे यांनी दिली. स्थानिक लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बांधील असून त्यांच्याकडून मागील दीड महिन्याच्या काळात शेतकऱ्यांना कोणतीही मदत झाली नाही. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालत याची माहिती महसूल मंत्र्यांपर्यंत पोहचवल्याने ४७ गावांमधील १९४ शेतकऱ्यांसाठी मदतीची आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान स्थानिक नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील इतर नेत्यांकडे मदतीचा प्रस्ताव द्यावा लागल्याने तालुक्यातील लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. राज्यात इतर प्रकरणांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसला कमी लेखत असताना इथे मात्र उलटी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Leave a Comment