हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपची सत्ता उलथवून टाकली. मोदी शाह यांनी कर्नाटकात तळ ठोकून, प्रचारसभा आणि रॅली काढूनही भाजपाला कर्नाटकात दारुण पराभवाला सामोरे जाऊ लागलं. काँग्रेसचे अचूक नियोजन, प्रचारातील मुद्दे, सर्व समाजांना एकत्र ठेवणं या सर्व गोष्टींमुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने कर्नाटकात ऐतिहासिक विजय मिळवला. आगामी २०२४ लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कर्नाटकातील विजय काँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेत्यांना पुन्हा एकदा नवीन उभारी देईल.
दक्षिण भारत कर्नाटक हे एकमेव राज्य होते ज्याठिकाणी भाजपची सत्ता होती. त्यामुळे कर्नाटकातील पराभवामुळे दक्षिण भारत भाजपमुक्त झाला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि कर्नाटकचे नेते मल्लिकार्जुन खर्गे याना काँग्रेसचं अध्यक्षपद देणं या २ गोष्टी काँग्रेसच्या पथ्यावर पडल्या असं म्हणता येईल. शिवकुमार-सिद्धरामय्या जोडीची मेहनत सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने देशात पुन्हा एकदा भाजपविरोधातील प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसचं समोर आली आहे. तिसऱ्या आघाडीच्या चर्चा देशात सुरु असल्या तरी काँग्रेस शिवाय आघाडी होऊच शकत नाही. कारण तिसऱ्या आघाडीतील पक्षांना मर्यादा आहेत तर काँग्रेसची पाळमोल संपूर्ण देशात अजूनही घट्ट रोवली आहे.
आज देशपातळीवर विचार केला तर हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि हिमाचल प्रदेशात सुखविंदर सिंग सुखू, तर भूपेश बघेल छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारचे नेतृत्व करत आहेत.तर आता कर्नाटकातील विजयामुळे आणखी एक राज्य काँग्रेसकडे गेलं आहे. तर दुसरीकडे तमिळनाडू, बिहार आणि झारखंडमध्ये स्थानिक पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस सत्तेत आहे. म्हणजे देशातील एकूण ७ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
2023 च्या अखेरीस आणि 2024 च्या सुरुवातीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या अनेक मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यांमध्ये कर्नाटकसारखाच ऐतिहासिक विजय मिळवून आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल.