शुभेच्छा स्विकारल्या अन् जेवायला गेलेल्या हवालदाराची गळफास घेवून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने पोलीस कॉलनीतील राहत्या घरी त्यांच्या वाढदिनीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अच्युत साहेबराव जगताप (वय- 31, मूळ रा. एनकूळ, ता. खटाव, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या हवालदाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गेली सात वर्षे पोलीस हवालदार म्हणून अच्युत जगताप हे कार्यरत होते. रविवारी त्यांचा वाढदिवस होता. सकाळपासून अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. दुपारी पोलीस कॉलनीतील राहत्या घरी ते जेवणासाठी गेले. घरातील दार बंद करून राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली. एका तपासाच्या निमित्ताने बाहेर जाण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस त्यांना फोन करत होते. मात्र, बराचवेळ ते मोबाईल उचलत नव्हते.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन पोलीस त्यांच्या घरी आले. घराबाहेर थांबून त्यांनी रिंग दिली असता मोबाईल वाजत होता. मात्र, जगताप फोन उचलत नसल्याने खिडकीतून जाऊन त्यांनी पाहिले. तेव्हा त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. अच्युत जगताप यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, पाच बहिणी, चार महिन्यांचा एक मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार करीत आहेत.