औरंगाबाद – वाळूचा ट्रक हद्दीतून जाण्यासाठी दरमहा 20 हजारांची मागणी करणाऱ्या दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हवालदार सुरेश कवडे (52) याला तडजोडीअंती 15 हजार रुपये रोख स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका वाळू व्यवसाय एकाची तक्रार आली होती. या तक्रारीत दौलताबाद पोलीस ठाण्याचे हवालदार हद्दीतून ट्रक पुढे जाऊ देत नव्हते. यावर तक्रारदाराने लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे केली. यावर पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमले. त्या पथकाने सापळा रचला. लाचलुचपत विभागाने सांगितल्याप्रमाणे, तक्रारदार यांनी हवालदार सुरेश कवडे यांना 20 हजारात काहीतरी कमी करा म्हणून विनंती केली. तेव्हा कवडे यांनी पाच हजार कमी केले. तडजोडीअंती 15 हजार रुपयांत ट्रक हद्दीतून सोडण्याचे ठरले. पंधरा हजार रुपये हॉटेलचालक विजय सोनवणे यांच्याकडे देण्याचे ठरले. आसेगाव फाटा येथील हॉटेल राजवीर येथे 15 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले.
त्यानंतर तक्रारदार पंधरा हजार रुपये घेऊन असेगाव फाट्यावर गेल्यानंतर हवालदार सुरेश कवडे यांनी पैसे हॉटेलचालक विजय सोनवणे यांच्याकडे देण्यास सांगितले. याच वेळी तक्रारदाराने पैसे देताच त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.