कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तांबवे परिसरात बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी दि. 9 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास लोकांच्या वस्तीत येऊन एका नऊ वर्षाच्या लहान मुलावर पाठीमागून हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांच्यात भितीचे वातावरण आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तांबवे गावच्या हद्दीत असणाऱ्या दक्षिण तांबवे या ठिकाणी बेघर वस्ती आहे. येथील राज दीपक यादव (वय 9 रा. तांबवे, ता. कराड) हा लहान मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. राज यादव हा घरामागील बाजूस बांधलेली गाई सोडण्यासाठी गेला असता. त्याच्यावरती अचानक बिबट्याने पाठीमागून हल्ला केला.या हल्ल्यानंतर राज यादव एकदम गोंधळून गेल्याने मोठ्याने ओरडू लागला. तेव्हा लोकवस्तीत बिबट्या घुसला असल्याने लोकांनी मोठा गोंधळ केला.
या गोंधळामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. परंतु बिबट्याने केलेल्या पाठीमागून हल्ल्यात या लहान मुलांच्या पाठीवरती मोठ्या जखमा झालेल्या आहेत. त्यामुळे आता तरी वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांच्यातून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी राज यादव याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.