सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 50 कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची घटना आज पहिल्यांदाच घडली. आज एकाच दिवशी 34 पुरुष आणि 16 महिला कोरोनाबाधित आढळले आहेत. आज एकाच दिवशी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 29 तर कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 435 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज मयत झालेली पहिली व्यक्ती शुक्रवार पेठ परिसरातील 54 वर्षांचे पुरुष असून 16 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 17 मे रोजी दुपारी बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली दुसरी व्यक्ती हत्तुरे वस्ती परिसरातील असून साठ वर्षाचे पुरुष आहेत 15 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 16 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले आहे. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली तिसरी व्यक्ती शुक्रवार पेठ परिसरातील असून पंचावन्न वर्षांच्या पुरुष आहेत. 14 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 15 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज नव्याने आढळलेल्या 50 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नीलम नगर परिसरातील चार पुरुष, किसन संकुल अक्कलकोट रोड येथील एक महिला, हत्तुरे वस्ती येथील एक पुरुष, इरण्णा वस्ती येथील एक पुरुष, जोशी गल्ली येथील एक पुरुष व एक महिला, कुमठा नाका येथील तीन पुरुष व दोन महिला, बुधवार पेठेतील एक पुरुष व एक महिला, जुना कुंभारी नाका येथील एक महिला, अशोक चौकातील दोन महिला, नइ जिंदगी येथील एक पुरुष, दत्त चौकातील एक पुरुष, न्यू पाछा पेठेतील एक महिला, इंदिरानगर येथील एक पुरुष, लोकमान्य नगर येथील एक पुरुष, मिलिंद नगर न्यू बुधवार पेठ येथील सात पुरुष व पाच महिला, मोदी येथील एक पुरुष, मुरारजी पेठ येथील एक पुरुष, पाछा पेठेतील दोन पुरुष, रेल्वे लाईन येथील दोन पुरुष, रविवार पेठेतील दोन पुरुष व एक महिला, साईबाबा चौकातील एक पुरुष व एक महिला, साठे पाटील वस्ती येथील एक पुरुष, शिवशरण नगर एमआयडीसी येथील एक पुरुष, सिद्धेश्वर पेठ येथील एक पुरुष अशा 50 जणांचा समावेश आहे.
कोरोना मुक्त झालेल्या सात जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 245 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.