सातारा | खंडाळा तालुक्याला कोरोना सेंटर झालेच पाहिजे, खंडाळ्याची मुलं जगली पाहिजेत, कारखानदारी बंद करा, खंडाळा तालुक्याची तरुण पिढी जगली पाहिजे, खंडाळा तालुक्याचा अंत पाहू नका आदी आक्रमक घोषणा देत, खंडाळा तालुक्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी व नागरिकांनी खंडाळा तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी विविध मागण्या प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील कारखाने 15 दिवस बंद करा, दि. 7 मे पासून कारखाने बंद न झाल्यास तहसील कार्यालय खंडाळा समोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तहसिलदार दशरथ काळे यांच्याकडे मागण्यांचे निवदेन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे, काँग्रेसचे खंडाळा तालुकाध्यक्ष एस. वाय. पवार, भाजपा खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुध्द गाढवे, शिवसेनेचे युवा नेते प्रदीप माने, आरपीआयचे रामदास कांबळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, गणेश जाधव, अंकुश पवार, सागर ढमाळ, अंकुश पवार, प्रमोद शिंदे, सुजित डेरे, नगरसेवक साजिद मुल्ला, गजानन भरगुडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटलेले आहे की, खंडाळा तालुका हा सातारा जिल्ह्यातील अत्यंत छोटा तालुका आहे. परंतू औद्योगिकीकरणामुळे हा तालुका आज कोव्हीड-19 या संसर्गजन्य आजारामुळे हवालदिल झाला आहे. तालुक्यातील कारखान्यामधील तरुण कामगारांचे मृत्यूचे प्रमाण व आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत गेल्यामुळे खंडाळा तालुक्यातील छोट्या-छोट्या खेडेगावात देखील कोरोनाचे 100 पेक्षाही जास्त रुग्ण सापडत आहेत. खंडाळा तालुक्यातील शेतकर्यांनी कारखानदारीसाठी कवडीमोल किमतीने आपल्या जमिनी दिल्या. आज त्याच शेतकर्यांची कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.
तेव्हा दि. 7 मे ते 23 मे अखेर खंडाळा तालुक्यातील सर्व कारखाने बंद ठेवून कोरोना या संसर्गजन्य आजारापासून तालुक्याचे रक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या तालुक्यातील कोरोना बाधितांची परिस्थिती समजावी म्हणून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba
Click Here to Join Our WhatsApp Group