हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाने आपल्या दहशतीने भल्या भल्यांची बोलती बंद केली आहे. विज्ञानाच्या कक्षा तोकड्या पडू लागल्या असताना ज्या गोष्टींवर पूर्वी बंदी आणायचं म्हटलं तर धडकी भरत होती, त्या गोष्टी आता लोक स्वेच्छेने बंद करु लागले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाउनची परिस्थिती उद्भवलेली असताना जनतेला जागृत ठेवायचं काम करणाऱ्या वृत्तपत्रांनीही येत्या आठवडाभर आपला अंक छापला जाणार नाही असं जाहीर केलं आहे.
त्यामुळे सकाळीच वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जनतेला छापील वर्तमानपत्र येत्या आठवडाभर तरी पाहता येणार नाही. आज वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पाठोपाठ पुण्यातही पेपर न टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आता २४ मार्च रोजीच अंक टाकल्यानंतर ३१ मार्चपर्यंत कोणीही विक्रेता पेपर टाकणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वर्तमानपत्रही बंद ठेवण्याचा निर्णय काही वृत्तपत्र व्यवस्थापनाने घेतला आहे. २५ ते ३१ मार्चदरम्यान वर्तमान पत्र बंद राहतील असं जवळपास निश्चित झालं आहे. वृत्तपत्रांच्या ई पेपर आणि ऑनलाईन एडिशन मात्र सुरू राहणार आहेत.