कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शहरातील कराड हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण चोरीस गेल्याची तक्रार कराड शहर पोलिसांत दिली आहे. महेश आनंदराव पाटील (रा. सोनकिरे ता. कडेगांव जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिासांनी दिलेली माहीती अशी, कराड हाॅस्पीटल येथे १८ मे रोजी महेश पाटील यांच्या आई इंदुताई आनंदराव पाटील यांना उपचारासाठी अॅडमिट केले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता, तसेच त्यांना ब्रेन स्ट्रोक आहे. हाॅस्पीटलमध्ये आईला दाखल करताना बेशुद्ध होती, त्यांच्या गळ्यात मिनी गंठण होते. दरम्यान तेथील डॉक्टरांनी तुमच्या आईचा कोरोना बरा होण्यासाठी सहा दिवस तुम्हाला अॅडमिट व्हावे लागेल असे सांगितले. सहा दिवसानंतर तेथील डॉक्टरांनी पाटील यांच्या आईला डिस्चार्ज दिला.
त्यावेळी ब्रेन स्ट्रोकमुळे त्या बेशुद्ध अवस्थेतच होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी निकम हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर डिस्चार्जची तयारी करीत असताना पाटील यांच्या आईच्या गळ्यातील मिनी गंठण दिसले नाही. त्यांनी हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. पण आईच्या गळ्यातील मिनी गंठण मिळून आले नाही. कोणीतरी त्यांच्या गळ्यातील गंठण चोरल्याची खात्री, झाल्यावर पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.