नवी दिल्ली । दिल्लीत दरदिवशी कमी प्रमाणात कोरोना विषाणूसाठीच्या चाचण्या होत असल्याची माहिती समोर आली होती. १४ जूनपर्यंत दिल्लीत दररोज ४००० ते ४५०० चाचण्या होत होत्या. मात्र आता रॅपिड अँटीजन चाचणीद्वारे जास्त प्रमाणात चाचण्या केल्या जाणार आहेत. सेक्टर चार मधील रत्नाकर अपार्टमेंटमध्ये पहिली रॅपिड अँटीजन चाचणी झाली आहे. या चाचणीद्वारे कमी वेळात रुग्णाचे अहवाल येऊ शकतात. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी १५ तसेच १६ जून रोजी मिळून १६ हजार ६१८ नमुने घेतल्याची माहिती दिली आहे. आता रॅपिड अँटीजन चाचणी द्वारे कंटेन्मेंट झोनमध्ये देखील चाचणी केली जाणार आहे. आज गुरुवार रोजी ६ हजार ५१० नमुन्यांचे निकाल येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्लीत मोठ्या संख्येने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ही चाचणी पद्धत सुरु करण्यात आली आहे. या चाचणीमुळे अगदी कमी वेळेत अहवाल येतील व रुग्णांचे निदान लवकर होण्यास मदत होईल. रॅपिड अँटीजन चाचणी कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट तसेच रुग्णालयात केली जाणार आहे. यासाठी दिल्लीत १६९ केंद्र तयार करण्यात आले आहेत. या चाचणीचे वैशिट्य म्हणजे रुग्ण जिथे असेल तिथे जाऊन ही चाचणी करता येते आणि अगदी ३० ते ६० मिनिटात हिचे अहवाल येतात. तर आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल यायला कमीत कमी ५ तास लागतात.
सध्या दिल्लीत २४२ कंटेनमेंट झोन आहेत. तसेच गृह मंत्रालयाने बुधवारी काही परिसरात स्वास्थ्य सर्वेक्षण सुरु केले असल्याचे देखील सांगितले आहे. या २४२ झोनमध्ये साधारण २ लाख ३० हजार ४६६ लोकसंख्या असून त्यातील १ लाख ७७ हजार ६९२ लोकांची तपासणी १५ आणि १६ जून रोजी केली असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. किट अपूर्ण असल्याने इतर लोकांची तपासणी २० जून रोजी केली जाणार आहे. त्यासाठीच १६९ केंद्राची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्या वाढती रुग्णसंख्या बघून कोरोना चाचणीची किंमत २४०० रु करण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”