कोरोना जास्तीचे बिल : निकोप, लाईफ लाईन आणि सिध्दीविनायक हाॅस्पीटलना दणका, साडेतीन लाख परतीचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण शहरातील निकोप, लाईफ लाईन आणि सिद्धीविनायक या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाकडून जास्तीचे घेतलेले 3 लाख 43 हजार 650 रुपये परत करण्याचे आदेश प्रशासनाने हॉस्पिटलला दिले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांकडून कोरोना उपचारासाठी भरमसाठ पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयांसाठी ऑडिटर्स नेमण्यात आले होते. या तपासणी समितीमुळे फलटण शहरातील निकोप हॉस्पिटलमध्ये तपासण्यात आलेल्या 114 देयकांपैकी 52 देयकात 2 लाख 25 हजार 200 रुपयांची तफावत आढळली तर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये तपासण्यात आलेल्या 552 देयकांपैकी 35 देयकात 82 हजार 550 रुपयांची तफावत आढळली आणि सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये तपासण्यात आलेल्या 93 देयकांपैकी 13 देयकात 35 हजार 200 रुपयांची तफावत आढळली.

तपासणी मध्ये या तीनही घेतलेल्या 100 जणांकडून ज्यास्तीचे घेतलेले 3 लाख 43 हजार 650 रुपये परत केले आहेत. आजअखेर 964 देयके तपासण्यात आली असून पुढील देयके तपासण्याची सदरची प्रक्रिया सुरु आहे. इन्शुरन्सची देयके वगळता इतर देयकेसणी करण्यात येत आहेत. ज्यादा रक्कम परत करण्यासाठी तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे देयकांची माहिती प्रांत कार्यालयात उपलब्ध आहे. रुग्ण व जवळचे नातेवाईक यांना पाहण्यास उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली आहे.