हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढणार असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक पुण्यात आले असून, जम्बोसह कोरोनाबाधित क्षेत्राची आज त्यांनी पाहणी केली,
कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचनाही या पथकाकडून करण्यात आल्या आहेत. पुढील दीड महिना म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र कोरोनाचा संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटीलेटर बेड्स सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य पथकानं दिल्या आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी पुण्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत होता. रोजच जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत असल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ होत होती. त्यानंतर आता प्रशासनाने लादलेल्या नियमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाण कमी झाला आहे. केंद्रीय पथकाने आज जिल्ह्यातील कोरोना स्थितीची पाहणी केली असता, डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं केंद्रीय पथकानं सांगितलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’