हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगार, मजुरांमध्येमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. मोठी शहरे सोडून कामगार आपल्या गावी परत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांची हालचाल रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जाव्यात आणि बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच्या कॅम्पमध्येच ठेवलं जावं, असे आदेश केंद्राकडून देण्यात आलेत.
मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान, कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी लॉकडाऊन सुरूच असल्याने शहरांमध्ये किंवा महामार्गांवर मजुरांची ये-जा थांबवण्याचे आदेश दिले आहेत.स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या राहण्याची सोय केली जावी तसंच त्यांना वेळेत मजुरी दिली जावी, असे आदेशही केंद्र सरकारनं दिलेत.
हे आदेश न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही केंद्रानं दिलाय. शहरांतून महामार्गांवर येणाऱ्या नागरिकांना जागीच थांबवलं जावं, असंही केंद्रानं म्हटलंय. स्थलांतर करणाऱ्या या नागरिकांसोबत करोनाही गाव-खेड्यात पोहचला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, याचा अंदाजा प्रशासनालाही आहे.नागरिकांनी हायवेवर येऊ नये. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, असं आवाहन करतानाच केंद्रानं राज्य सरकारलाही या लोकांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय करण्याचे आदेश दिले आहेत.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.