औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील घाटी हॉस्पिटलमध्ये १८ एप्रिल रोजी एका कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती झाली होती. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मात्र प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीण दोघींना वेगवेगळं ठेवण्यात आले आहे. आज आईने व्हिडिओ काॅलवरुन आपल्या ६ दिवसांच्या चिमुकलीसोबत संवाद साधला.
महत्वाची गोष्ट म्हणजे सदर चिमुकलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तिची प्रकृती स्थिर आहे. सदर महिलेची प्रसुती जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया पद्धतीने करण्यात आली होती. गरोदर महिला कोरोनाबाधित असल्यामुळे तिची प्रसुती करणं, डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, कोरोनाविरुद्ध लढा देणारे डॉक्टर आणि नर्सने महिलेची यशस्वी प्रसूती केली. दरम्यान, आता महिलेची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. बाळाचे वजन सव्वा तीन किलो भरले असून ते ठणठणीत आहे.