मुंबई | आमच्या कंपनीच्या गादीवर झोपा, कोरोना दूर होईल, अशी जाहिरात करणाऱ्या एका कंपनीला मुंबई ग्राहक पंचायतने चांगलाच दणका दिला आहे. ‘कोरोनावर गुणकारी गादी’, अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या कंपनीला सदर जाहिरात मागे घेणे भाग पडले आहे.
भारतीय जाहिरात मानांकन परिषदेकडे ‘एएससीआय’ मुंबई ग्राहक पंचायतच्या डॉ. अर्चना सबनीस यांनी याबाबत तक्रार केली होती. सध्या कोरोनामुळे सगळीकडे काहीसे भीतीचे वातावरण आहे. याचा फायदा उचलण्यासाठी अरिहंत मॅट्रेसेस या कंपनीने एका वृत्तपत्रात ही जाहिरात दिली होती.
१५ हजार रुपयांची ही गादी विकत घ्या आणि त्यावर झोपा, आपला कोरोना दूर होईल, असा दावा या जाहिरातीत कंपनीने केला होता. दरम्यान, पुन्हा असा प्रकार आढळल्यास आम्हाला कळवावे, असे ‘एएससीआय’ने म्हटल्याचे ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले.