नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोना लसीची डोळे लावून वाट पाहत आहे. दरम्यान, काही कंपन्यांना कोरोनावर लस शोधण्यास जवळपास यश मिळालं आहे. अशा वेळी जगभरात कोरोना लशींची या कंपन्यांकडे आगाऊ नोंदणी करण्याची चढाओढ लागली आहे. त्यातच आता कोरोना व्हायरसच्या लसीच्या डोसची नोंदणी करण्यात भारत आघाडीवर असून जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारताने आतापर्यंत कोविड-19 लसीच्या 160 कोटी डोसची नोंदणी केली आहे.
जगभरात लसीच्या ऑर्डरवर ड्यूक युनिवर्सिटीने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत युरोपियन युनियनने 158 कोटी आणि अमेरिकेने 100 कोटींहून अधिक कोरोना लसींची नोंदणी केली आहे. जर या लसी चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्या, तर यांच्या लसीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरच लोकांना लसीचा डोस देण्यास सुरुवात करण्यात येईल.
३ कंपन्यांसोबत केले करार
सर्वात जास्त ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या वॅक्सिनची मागणी करण्यात येत आहे. अनेक देशांनी या लसीचे 150 कोटी डोस बुक केले आहेत. भारतात ऑक्सफोर्डच्या लसीचा सीरम इंस्टिट्यूट आणि एस्ट्रेजेनिकप्रमाणे क्लिनिकल ट्रायल करण्यात येत आहे. भारत आणि अमेरिकेने या वॅक्सिनचे 50-50 कोटी डोस बुक केले आहेत. याव्यतिरिक्त नोवावॅक्सच्या वॅक्सिनचे 120 कोटी डोस आतापर्यंत बुक करण्यात आले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापण्यात आलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं की, भारत जुलै-ऑगस्ट 2021 पर्यंत 50 कोटी डोस मिळवण्यासाठी वॅक्सिन निर्मात्यांच्या संपर्कात आहेत. ड्यूक युनिवर्सिटीच्या अहवालानुसार, भारताने रशियाच्या कोरोनावरील लस Sputnik V चे 10 कोटी डोस आणि नोवावॅक्सच्या लसीचे 100 कोटी डोसचा करार केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’