जयपूर । प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने कोरोनावर औषध म्हणून बनवलेले ‘करोनिल’ औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात करोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे. बाबा रामदेव आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याच्या वृत्ताला ज्योति नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ सुधीर कुमार उपाध्याय यांनी दुजोरा दिला. बलराम जाखर यांनी हा एफआयआर नोंदवला आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांनी मंगळवारी समारंभपूर्वक करोनिल औषधाचे लाँचिंग केले. “कोरोनावर १०० टक्के लागू होणारं औषध आणि ७ दिवसांत कोरोना बरा होईल,” असा दावाही रामदेव बाबा यांच्या पतंजलीने केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले तसेच करोनामधून मुक्ती देणारे औषध अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले. मात्र, शुक्रवारी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले कि, “आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या कोरोनाचं औषध म्हटलं नाही,”. आचार्य बालकृष्ण यांच्या या स्पष्टीकरणानंतर रामदेव बाबांच्या करोनिल औषधाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झालं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”