सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
शासकीय रूग्णालये व जिल्हा परिषदेच्या रूग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेची रूग्णालये करण्यात येणार आहेत. त्यानुसार सिव्हिलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दवाखाने, प्रसुतीगृहाची पाहणी करून सुविधाबाबतचा अहवाल द्यावा. त्या अहवालाप्रमाणे महापालिकेच्यावतीने तिथे सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली.
महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद, शासकीय रूग्णालय व मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात आलेल्या गर्भवतीला तेरा तास ताटकळत ठेवून रात्रीच्यावेळी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मातेच्या गर्भात अर्भकाचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत महापौर संगीता खोत यांनी बैठक घेतली होती.
महापालिकेच्या दवाखाने व प्रसुतीगृहाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दवाखान्यात रुग्णाला अपुऱ्या सुविधा मिळत आहेत. प्रसुतीगृहातही वेगळी स्थिती नाही. त्यात या विभागाकडे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे आवश्यक ते कर्मचारी भरण्याचा निर्णय बैठकीत झाला.