मनपा उभारणार दीड हजार बेड्सचे कोवीड सेंटर ः पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद | शहरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. गंभीर रूग्णांना देखील शहरात उपचारासाठी बेड्स मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे महापालिकेने आता दोन जम्बो कोवीड केअर सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही सेंटरचे मिळून 1500 बेड्सची व्यवस्था केली जाणार आहे. सोबतच चार कोवीड केअर सेंटर्समधील एक हजार बेड्सला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती शनिवारी पालिका प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढू लागली आहे. विशेष करून मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून रोजचे हजारपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहे. विशेष म्हणजे यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातीलच रूग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे पालिकेच्या कोवीड केअर सेंटरमध्ये, शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपलब्ध बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बेड्स मिळवण्यासाठी रुग्णालयांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. शहरात परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जम्बो कोवीड केअर सेंटर सुरु करता येतील का, याचा आढावा घेतला होता.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यासह त्यांनी काही जागांची पाहणी देखील केली. सुभाष देसाई यांनी केलेल्या पाहणीनंतर पालिका प्रशासन सतर्क झाले. आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनीही आपल्या अधिकार्‍यांसह शहरातील चार ते पाच ठिकाणांची पाहणी केली. जम्बो कोवीड केअर सेंटर सुरु करण्यासाठी त्यांनीही आढावा घेतला. त्यानंतर आता त्यांनी दोन ठिकाणी जम्बो कोवीड केअर सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा शनिवारी केली.

आयडिया सेंटर, कलाग्राम जागेची निवड…

नियोजनानुसार आयडिया कॉल सेंटर इमारतीत 1100 बेड्सची व्यवस्था केली जाणार आहे.  कलाग्रामसमोरील चिलकठाणा औद्योगिक वसाहतीमधील मराठवाडा कंपनीच्या इमारतीत 400 बेड्सचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. या दोन्हीही ठिकाणी आवश्यक ती कामे सुरु करण्याचे आदेश आयुक्त पांडेय यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. येत्या काही दिवसात दोन्हीही जम्बो कोवीड केअर सेंटर्स सुरु होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like