औरंगाबाद – महानगर पालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन केले आहे. या पथकाने मागील पंधरा दिवसात 16 मालमत्ता सील करून 13 नळ कनेक्शन कट केल्या आहेत. तसेच 62 लाख रुपये कर वसूल केल्या असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे.
मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची थकबाकी 465 कोटींपर्यंत पोहोचली आहे. थकबाकी वसूल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक मालमत्ताधारकांनी कर आकारणी आणि थकबाकी बद्दल आक्षेप नोंदवले आहेत. त्यावर सुनावणी घेतली जात आहे. थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार विशेष भरारी पथक स्थापन केले आहेत. या पथकाकडे थकबाकी असलेल्या व्यवसायिक मालमत्ता धारकांची यादी देण्यात आली आहे.
हे भरारी पथक थेट जाऊन थकित कर्जाच्या रकमेची मागणी करत आहे. थकबाकी न भरल्यास मालमत्ता सील करणे किंवा नळ कनेक्शन तोडले जात आहे. मागील 15 दिवसात या पथकाने 16 मालमत्ता सील केल्या असून 13 नळ कनेक्शन तोडले आहेत. कारवाई टाळण्यासाठी काही मालमत्ताधारकांनी 62 लाख 9 हजार 900 रुपयांचा कर भरला आहे. सध्या महापालिकेकडून थकबाकी वरील 75 टक्के व्याज ही माफ करण्यात आला आहे. एकाच वेळी थकबाकी भरल्यास मालमत्ता धारकाला व्याजावर 75 टक्के सूट मिळत आहे.