औरंगाबाद | शहरातील मिटमिटा येथे महापालिकेतर्फे प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाच्या काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर यासाठी अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश देखील दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिकेने सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली आहे.
महापालिका हद्दीतील मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय असलेले 14 एकर जागेवरील सिद्धार्थ उद्यानात प्राण्यांसाठी जागा कमी पडत असल्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने तातडीने प्राणिसंग्रहालयाची मान्यताच रद्द केली होती. मिटमिटा येथे होणाऱ्या उद्यानात सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील सर्व 250 प्राणी स्थलांतरित करण्यात येतील.
जागतिक दर्जाचे सफारी पार्क उभारण्यासाठी 55 हेक्टर जमीन सध्या उपलब्ध आहे. अतिरिक्त जागेमध्ये वाघ आणि सिंहाची सफर घडविण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याचे काम सूरु करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव जवळपास पूर्ण होत आला आहे. लवकरच शासनाला सादरही करण्यात येईल. त्याचबरोबर या कामासाठी निधीची देखील मागणी केली जाणार आहे. असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.