वाशीम प्रतिनिधी । कारंजा येथे २ डिसेंबर २०१९ पासून सीसीआय मार्फत शासकिय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु आहे. यंदाच्या कापूस हंगामात शासकीय कापूस खरेदी केंद्रावर तब्बल ३० हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली असून कापसाची खरेदी फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
खुल्या बाजारात कापसाचे दर पडल्याने पणन महासंघाच्यावतीने कापसाची शासकीय खरेदी सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. यासाठी १२ टक्क्यापेक्षा कमी आर्द्रतेची अट घालण्यात आली आहे. सततचे बदलते वातावरण, पावसातील खंड, पडलेले बाजारभाव व अपेक्षित उत्पादनात येणारी घट या कारणांमुळे शेतकर्यांनी अलिकडे खरीप हंगामातील पारंपारिक पिकांना बगल देत आपला मोर्चा मान्सूनपूर्व कपाशी लागवडीकडे वळविल्याने कपाशीच्या क्षेत्रात वाढ होवून उत्पादनही वाढले.
परंतु खुल्या बाजारात गरजेपेक्षा जास्त कापूस विक्रीसाठी आल्याने खासगी व्यापार्यांनी कापसातील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याचे कारण पुढे करून कापसाचे दर पाडले होते. यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने कापसाची खरेदी सुरू केली. खरेदी करण्यात आलेल्या कापसाला ग्रेडिंगनुसार ५ हजार ५० रूपयापासून ५ हजार ४५० रूपयापर्यंत दर देण्यात येत आहे. १७ फेब्रुवारी पर्यंत कापूस विक्री करणार्यांचे चुकारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर काही शेतकर्यांचा कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात येत असल्याने खरेदी केंद्रावर व्यापार्यांचाच कापूस खरेदी केल्या जात असल्याचा आरोप शेतकर्यांकडून केल्या जात आहे. तर ज्या शेतकर्यांचा कापूस शासकिय खरेदी निकषात बसत नाही असा कापूस खरेदी केल्या जात नाही असं कापूस खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.