हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बिहारमध्ये (Bihar) एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी सुपौलमध्ये (Supaul) कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब असलेला पूल कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या 50, 51 आणि 52 क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळले आहे. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर नऊजण गंभीर जखमी आहेत. इतकेच नव्हे तर, पुलाच्या ढिगार्याखाली 20 पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रशासनाचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. (Bihar Bridge Collapse)
सध्या बिहारमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान भारतातील सर्वात मोठा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु काम सुरू असतानाच या पुलाचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे बचाव कार्यासाठी थोड्या वेळापूर्वीच प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. परंतु, पुलाच्या पिलरचे गार्टर मध्यभागीच कोसळल्यामुळे पुरेशी उपकरणे त्या ठिकाणी पोचू शकत नाहीयेत. त्यामुळेच ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.
दरम्यान, देशातील सर्वात लांब पुलाचे काम सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींना सरकारकडून मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे हा पूल बांधण्यासाठी 1199 कोटी 58 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे संपूर्ण बांधकाम 2023 पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. पर्यंत अनेक अडथळ्यांमुळे हे काम पुढे सरकत गेले. आतापर्यंत या पुलाचे फक्त 56 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पुलावर एकूण 171 पिलर असणार आहेत, आत्तापर्यंत यातील 166 पिलरचे काम पूर्ण झाले आहे.