सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरजेत प्रसिध्द वकिलाची अडीच लाख फी दिली नाही म्हणून मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली. महापालिकेची लक्तरे निघाली असून वसुलीसाठी पथक जप्तीसाठी महापालिकेत पोहचल्यावर अधिकार्यांचे मात्र धाबे दणाणले. मात्र अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी दोन लाखाचा चेक दिल्यानंतर न्यायालयाचे पथक परत गेले.
महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मिरज न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका कार्यालयात न्यायालयाचे बेलीफ हे अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी आले होते. मिरजेतील प्रसिद्ध वकील प्रशांत नरवाडकर हे गेले अनेक वर्षे महापालिकेच्या पॅनलवर काम करत होते. सदर कालावधीत त्यांची फी महापालिकेने दिली नाही. याबाबत त्यांनी मिरज न्यायालयात 2019 साली वसुलीचा दावा दाखल केला. न्यायालयाने 2021 रोजी महापालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता न्यायालयाचे पथक महापालिकेत जप्तीसाठी दाखल झाले.
यावेळी न्यायालयाचे बिलीफ यांनी अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई सूरु करत असताना अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी मध्यस्थी करत फिर्यादी यांना दोन लाखात तडजोड करून सायंकाळी 2 लाखाचा चेक दिल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. मात्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यास पथक आल्यामुळे महापालिका कार्यालयात एकच धावपळ उडाली होते. महापालिकेच्या कारभाराची लक्तरे निघाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेने शहरात मात्र महापालिका कारभार कसा सुरू आहे हे चित्र स्पष्ट झाले.