हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित नऊ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर आणि यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित 9 कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यांनी हा संप मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारने त्यांना वेळ दिली होती. ती वेळ गुरुवारी संपली असून आजपासून कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यास एसटी महामंडळ सज्ज झालं आहे