हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे.
तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर, ठाणे या ठिकाणी लहान मुलांसाठी कोव्हीड सेंटर उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश सरकारने दिले आहे.
तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर होणारा प्रादुर्भाव पाहता पुणे महापालिका अलर्ट मोडवर आहे. त्यासाठी आता पुण्यात देशातील पहिलं चाईल्ड कोविड केअर सेंटर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात हे चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारलं जाईल. या ठिकाणी 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे.
पुण्याप्रमाणेच औरंगाबाद महापालिकेकडूनही लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. औरंगाबादेतील एमजीएम परिसरात 100 खाटांचे कोविड बाल रुग्णालय उभं राहणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची तयारी सुरू केली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.