सातारा | वडूज येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने कोरोना बाधित एका महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेर रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. खटाव तालुक्यात ही परिस्थिती असेल तर इतर तालुक्यात काय परिस्थिती असेल हेही प्रशासनाने जाणून घेण्याची गरज आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाची साथ आल्याचे जाहीर होताच वडूज ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्यांनी रुग्णालयाच्या आवारातील झाडाखाली टेबल टाकून रुग्ण तपासण्यास सुरुवात केली होती. रुग्णांना वाटते डॉक्टर हे देवाच्या रुपात येतात, मात्र आजचा आणि मागील वर्षीचा प्रकार पाहिला तर रुग्णाला आरोग्य विषयक गरज पुर्ण करण्यासाठी खासगी दवाखानाच बरा असे म्हणण्याची वेळ शासकीय रुग्णालयातील कर्मचार्यांनी आणली आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, येथील 75 वर्षीय एक वृध्द महिला आज सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कोरोना तपासणीसाठी आली होती. तपासणीनंतर संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी महिलेची ऑक्सिजन लेवलची तपासणी केली असता ती कमी होती. त्यातच ग्रामीण रूग्णालयातील कोव्हिड सेंटर बंद होते आजपासून ते कार्यान्वीत करण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी स्टाफ उपलब्ध न झाल्याने ते सेंटर सुरू होऊ शकले नाही. शिवाय ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग सुरू असल्याने त्याठिकाणी रूग्ण होते. त्यामुळे संबंधित महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच एका रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यानंतर महिला रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र, तीन ते चार तास रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी कोरेगाव येथील खासगी रूग्णवाहिकेशी संपर्क साधून त्या रूग्णवाहिकेने रूग्णाला सातार्याला नेले. या घटनेची चर्चा आज शहरात सुरू होती. शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण रूग्णालयातील कोव्हीड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रशासनाने लॉकडाऊनचे कडक निर्बंध करून कोरोनावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने येथील कोव्हिड सेंटर सुरू करावे. अन्यथा कोरोना बाधित रूग्णांना शासकीय कार्यालयांत आणून दाखल करू असा इशारा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा