मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियानं इंग्लंडचा 151 रननं पराभव केला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीनं 89 रनची नाबाद भागिदारी करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. लॉर्ड्स टेस्टमध्ये घडलेल्या एका घटनेनं भारतीय क्रिकेट फॅन्स नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मैदानात नेहमी शांत असणारा जसप्रीत बुमराह पाचव्या दिवशी चांगला संतापला होता. यानंतर बुमराहाने आक्रमक खेळ करत भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 34 रन काढले तसेच 33 रन देत 3 विकेट्सही घेतल्या. त्याचे हे आक्रमक रुप टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खानला आवडले आहे.
झहीर खानने एका मुलाखतीत सांगितले कि, ‘बुमराहला राग आल्यानंतर तो असं प्रदर्शन करणार असेल तर त्याला यापुढेही राग आला पाहिजे. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. ही गोष्ट बुमराहला खटकत असणार. त्यानंतर मैदानात अँडरसनसोबत त्याचा जो संवाद झाला त्यानंतर इंग्लंडचे सर्व खेळाडू त्याच्या मागे पडले होते. यानंतर बुमराहनं रागाचा उपयोग योग्य ठिकाणी केला.
मैदानात नेमके काय घडले होते?
लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर जोरदार निशाणा साधला होता. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले होते. यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर अंपायरला मध्ये पडून हा वाद सोडवावा लागला होता. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीसुद्धा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.