हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. सौरव गांगुली सध्या कोलकातामधील वुडलॅन्ड्स रुग्णालयात उपचार घेत आहे. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.
रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं.
सौरव गांगुलीची पहिली एन्जियोप्लास्टी करण्यात आली आहे. यामध्ये त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेन टाकण्यात आली आहे. गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत. एका रक्तवाहिनीत 90 टक्के ब्लॉकेज आहे. सर्जरीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेंट्स टाकले जाऊ शकतात.
दरम्यान, गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यपाल जयदीप धनकर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी गांगुलीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ममतांनी सौरव गांगुलीच्या भेटीनंतर बोलताना हृदयविकाराच्या त्रासाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. “गांगुलीची प्रकृती चांगली आहे. तो आराम करत असून त्याने मी ठीक आहे की नाही? अशी विचारणा केली. मला आश्चर्य वाटतं की त्याने यापूर्वी स्वतःची चाचणी केली नव्हती. तो एक खेळाडू आहे. त्याला अशी समस्या होती, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. डॉक्टर अँजिओप्लास्टीची तयारी करत आहेत. मी डॉक्टरांचे आभार मानते,” असं ममता म्हणाल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’