हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये आपण क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं युवराजने जाहीर केलं आहे.विशेष म्हणजे जून 2019 मध्ये युवराज सिंह यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती
युवराजनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये 2007 मध्ये एकाच षटकात लगावलेले सहा षटकार आणि कटक येथे 150 धावांची केलेल्या धुवांधार खेळी दिसत आहेत. युवराज म्हणतो देव तुमचं नशीब लिहित असतो. लोकांची मागणी लक्षात घेता मी फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परतेन अशी आशा आहे. यापेक्षा छान भावना असूच शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाला पाठिंबा देत राहा. कारण एक खरा चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!’, असं युवराजनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
https://www.instagram.com/tv/CVv7NX3DKjg/?utm_medium=copy_link
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. युवीने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 चेंडूंवर सलग सहा षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यामुळे युवराजला ‘सिक्सर किंग’ ही नवी ओळख मिळाली.