धावजी पाटील मंदिरात भूत उतवणाऱ्या मांत्रिकासह चाैघांवर गुन्हा

Superstition
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सुरुर (ता. वाई) येथील धावजी पाटील मंदिरात अघोरी करणी करणाऱ्या 4 संशयितांविरोधात भुईंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वयंघोषित मांत्रिक मंदिरामध्ये एकाच्या अंगातून भूत उतरवण्याचा प्रकार समोर आला असून मंत्रिकावर जादूटोणा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

याबाबत भुईंज पोलिसांनी सांगितले, की महामार्गावर प्रसिध्द असलेल्या सुरुर (ता. वाई) येथील धावजी पाटील मंदीरात अॅड. मनोज माने हे मंगळवारी दुपारी दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्वयंघोषित मांत्रिक मंदिरामध्ये एकाच्या अंगातून भूत उतरवण्याचा प्रकार करत होता. यावेळी मंदिरात सुरू असलेला अघोरी उपचार व गुलालाचे रिंगणात ठेवलेले साहित्य, लिंबू आदींचे मोबाईलमधून रेकॉर्डिंग करून त्याद्वारे भुईंज पोलिसांत जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत चार संशयित व्यक्तींविरोधात फिर्याद दिली होती. सुरूर येथील धावजी पाटील मंदिरातील मांत्रिक भूत लागलेल्या व्यक्तीस मारहाण करत भीतीदायक वातावरण निर्माण करत होता.

संबंधित मांत्रिक गुन्हा दाखल होताच मांत्रिक तेथून पसार झाला आहे. या प्रकरणातील नेमकी सत्यता पडताळणीसाठी व त्या चार जणांना ताब्यात घेण्यासाठी भुईंज पोलीस रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दिली. दरम्यान, या प्रकारानंतर अंनिसचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, सुरूर येथील धावजी पाटील मंदिरात गेल्या अनेक दिवसांपासून स्वयंघोषित मांत्रिकाकडून अशा प्रकारचे अघोरी कृत्य सुरू आहे. याला कायमचा आळा बसविणे गरजेचे आहे.

अंनिसची अंधश्रध्दा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी
साताऱ्यात भुईंज सुरूर येथील धावजी पाटील मंदिरात अघोरी कृत्य सुरू असल्याचा प्रकार समोर आला. धावजी पाटील मंदिर, अंगातील भूत उतरवण्याचा प्रकार एका मांत्रिकाकडून सुरू असून हा मांत्रिक भूत लागलेल्या व्यक्तीस शिवीगाळ आणि मारहाण करत भीतीदायक वातावरण निर्माण तयार करत असल्याचे दिसत आहे. मांत्रिकावर अंधश्रद्धा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याची तक्रार भुईज पोलीस स्टेशन देण्यात आली मात्र पोलीस स्टेशनकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप ऍडव्होकेट मनोज माने यांनी केला आहे. यावर अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ हमीद दाभोलकर यांनी देखील या ठिकाणी अनेक वर्षांपासून जादूटोणा करून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असून याची तक्रार केली असल्याचे सांगत संबंधित मंत्रिकावर जादूटोणा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.