आधी पतीची चाकूने भोसकून हत्या; नंतर स्टेटसवर कबुली देत पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एका महिलेने आपल्या पतीची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर सोशल नेटवर्किंग साइटवर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर स्वतःआत्महत्येचा प्रयत्न केला. नवी दिल्लीतील छतरपूर एक्स्टेंशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी सांगितले की, महिलेचे नाव रेणुका असून, ती मध्य प्रदेशातील उज्जैन येथे राहत होती. तिचा पती चिराग शर्मा हरयाणाच्या यमुनानगरमध्ये राहत होता. दोघेही एका इन्श्युरन्स कंपनीत काम करत होते. चिराग हा सेल्स विभागात काम करत होता. तर रेणुका ही ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये काम करत होती.

८ वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, त्यांना मुल नाही. दोघेही छतरपूर एक्स्टेंशन परिसरात राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये वाद होत होते. शनिवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते. महिलेने चाकू भोसकून पतीची हत्या केली. त्यानंतर फेसबुकवर स्टेटस ठेवून हत्येची कबुली दिली. तसेच तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला. घरमालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

दोघेही पती-पत्नी बेशुद्धावस्थेत होते. रेणुका बेडवर पडलेली होती. दोघांनाही पोलिसांनी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून चिराग याला मृत घोषित केले. महिलेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे. महिलेचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. पतीच्या हत्येचे कारण जाणून घेण्यासाठी कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे. शेजारी आणि घरमालकाची चौकशी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’