हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या मुहूर्तावर एक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील पिक विमा कंपन्यांकडून पहिल्या टप्प्यात तब्बल 1700 कोटी रुपये पिकविमा अग्रीम वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीत बहुतांश शेतकऱ्यांना पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळणार आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाईल. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना होणार आहे
मध्यंतरी बदलत्या हवामानामुळे आणि पावसाळा अभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे एक रुपयांत पिकविमा योजनेत राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. यानंतर, नुकसान भरपाई अंतर्गत पिकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करुन 25 टक्के अग्रीम पिकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. परिणामी बहुतांश कंपन्यांनी विभागीय आणि राज्यस्तरावर अपील केले होते. आता या अपिलांच्या सुनावणीवरून एकूण 1700 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यास पीक विमा कंपन्यांनी मान्य केले आहे.
मुख्य म्हणजे, या अपीलांची जसजशी सुनावणी करण्यात येईल तसे शेतकरी लाभार्थी संख्या आणि अग्रीम रक्कम यामध्ये वाढ होणार आहे. सध्या राज्यातील, तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. मध्यंतरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली धनंजय मुंडे यांनी राज्यातील पिकविमा कंपन्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये अग्रीमचा तिढा तातडीने सोडवण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार, आता विमा कंपन्यांकडून पहिल्या टप्प्यात 1700 कोटी रुपये पिकविमा अग्रीम वितरण करण्याबाबत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.