कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड- पाटण मार्गावर मुंढे (ता. कराड) येथे चारचाकी गाडी रस्ता दुभाजकाला धडकली. यामध्ये चारचाकी गाडीच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे. शेजारून चालणाऱ्या टेम्पो आणि चारचाकी चालकाच्यांत यामुळे काहीकाळ वाद सुरू होता. रस्त्यावरून सुसाट निघालेल्या चारचाकी क्रेटा गाडी डिव्हाईडला धडकल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले.
घटनास्थळावरील माहिती अशी, मुंढे गावच्या हद्दीत जाधव ढाब्यासमोर हा अपघात झाला. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेटा गाडी (क्र. एमएच- 47-के- 1011) आणि शेजारून चाललेला टेम्पो क्रमांक (एमएच- 50-एम- 5464) या गाडी चालकांच्यात काहीकाळ वाद सुरू होता. क्रेटा गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. तर टेम्पो रस्त्यात मध्येच उभा करण्यात आला होता.
कराडहून पाटणच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. गाडी रस्त्यावर दुभाजकाला धडकल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी दोन्ही वाहन चालकांच्यात बराच वेळ वादावादी सुरू होती. क्रेटा ही चारचाकी गाडी ड्रायव्हिंग स्कूलची असल्याची माहिती समजत आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.