औरंगाबाद – सीबीएसईतर्फे गुरुवारपासून सीटीईटी परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, दुपारच्या सत्रात घेण्यात येणारा पेपर-2 अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी केंद्राबाहेर ताटकळत उभे होते. तांत्रिक अडचणींमुळे पेपर रद्द केल्याचे सांगण्यात आल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. सीबीएसईतर्फे सीटीईटी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता घेण्यात येणारा पहिला पेपर सुरळीत पार पडला. त्यानंतर दुपारच्या सत्रातील पेपर 2:30 वाजता घेण्यात येणार होता. त्यासाठी विद्यार्थी निश्चित वेळेत परीक्षा केंद्रावर पोचले होते. ऑनलाइन लॉगिन झाले, परंतु पेपरच ओपन होत नव्हता.
त्यामुळे तब्बल दीड तास विद्यार्थी केंद्रावरच खोळंबले होते. त्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे पेपर होणार नसल्याचे कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सीबीएसईकडून पहिल्यांदाच शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा 13 जानेवारीपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे. अचानक पेपर रद्द झाल्याचे कळाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. शहरातील 25 ते 30 खासगी संस्थांना सेंटर देण्यात आले होते. परीक्षा रद्द झाल्याने काही केंद्रावर विद्यार्थी, पालकांकडून आक्रोश व्यक्त करत निदर्शने करण्यात आली. त्यामुळे या केंद्रावर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातून या परीक्षेसाठी सुमारे आठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सर्व्हरसंबंधी अडचणी येत असल्यामुळे पेपर रद्द करण्यात आला. पेपर रद्द झाला तो केव्हा होईल याबाबतचे वेळापत्रक वेबसाईटद्वारे लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
सध्या एसटी सेवा बंद असल्यामुळे दुप्पट भाडे देवून जिल्हाभरातील विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर झाले होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव दुसऱ्या सत्रातील पेपर रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. उद्या सकाळी साडेनऊ वाजता बाल मानसशास्त्र, पर्यावरण अध्याय, गणित, भाषा अशा पाच विषयांचा (प्रत्येक विषयाला तीस मार्क) दिडशे मार्काचा पेपर होणार आहे, असे किरण भोळे या परीक्षार्थ्याने सांगितले.