दक्षिण अमेरिकेच्या शेजारी, कॅरिबियन समुद्रात, एक छोटा बेट असलेला देश क्युबा – हा कोरोना विषाणूच्या या महासाथीविरुद्ध विक्रमी काम करत आहे. क्युबाने नेहमीच इतर देशांना वैद्यकीय आणि इतरही बरीच मदत केली आहे. परंतु बहुदा क्युबन डॉक्टरांच्या मानवतावादी कार्याची दखल घेतली जात नाही. क्युबाच्या लोकांनी १९६० च्या क्रांतीनंतर स्वतःच्या देशात उभारलेल्या अनुकरणीय आरोग्य आणि सार्वजनिक लोक-कल्याण व्यवस्थेचीही दखल घेतली जात नाही. आज या संकटात सर्व देशांना क्युबा एक नवी वाट दाखवत आहे. त्याबद्दल दोन शब्द.
गेल्या महिन्याची गोष्ट. ब्रिटनचं एक यात्री जहाज – एम. एस. ब्रेमर – हे कॅरिबियन सागरात असताना ५ यात्रींना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आणि २८ यात्री आणि २७ कर्मचा-यांना त्याची लक्षणं दिसत होती. एकूण ६६८ यात्री या जहाजात होते. कॅनडा, आयरलॅंड, इटली, कोलोंबिया, नॉर्व्हे, नेदरलॅंड्स, स्वीडन, जपान व ऑस्ट्रेलिया अशा नऊ देशांचे नागरिक यात्रा करत होते.
कॅरिबियन समुद्रकिनाऱ्याचे देश – डोमिनिकन रिपब्लिक, बहामास, बार्बडोस (म्हणजे वेस्ट – इंडीज चे देश) आणि खुद्द अमेरिका (USA) यांनी जहाजाला आपल्या बंदरांमध्ये प्रवेश नाकारला. परंतु क्युबा देशात कोरोनाची लागण असतानाही, माणुसकीच्या नात्याने या जहाजाला क्युबाच्या मेरियल बंदरावर उतरण्याची परवानगी दिली. ब्रिटनच्या सरकारने क्युबाला यासाठी धन्यवाद दिला. महत्वाची गोष्ट ही, की क्युबाने हे कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी केलं नाही. स्वतःचा जीव धोक्यात टाकून दुसऱ्या लोकांच्या मदतीला धावून जाणं हे या देशाच्या लोकांची परंपरा आणि चरित्र आहे.
याची काही इतर उदहरणं :
हैती देशात कॉलरा महामारी पसरली होती तेव्हाही क्युबाचे डॉक्टर – “सफेद पोशाखातली सेना” – तिथे मदतीला गेली. २०१४-१५ मध्ये अफ्रिकेच्या पश्चिम भागातील देशांमध्ये इबोला विषाणूची जीवघेणी महामारी पसरली होती. ही साथ इतकी भयानक होती की इथले लायबेरियासारख्या काही छोट्या देशांची पूर्ण लोकसंख्या नष्ट झाली असती. अशा वेळेलाही क्युबाचे डॉक्टर गेले आहेत.
कोरोनाचं सर्वात मोठं केंद्र झालेल्या इटलीच्या मदतीला ५२ डॉक्टरांची तुकडी क्युबामधून गेली आहे. या गरीब देशाने एका प्रगत युरोपीय देशाच्या मदतीला डॉक्टर पाठवले आहेत, जेव्हा की युरोपच्या इतर देशांनी इटलीला अशा प्रकारची मदत नाकारली. कोरोनाविरुद्ध लढायला आतापर्यंत ६ देशांमध्ये क्युबाची तुकडी गेली आहे. अशा प्रकारे गेल्या ५६ वर्षात, क्युबाने १६४ देशांच्या मदतीला ४ लाख पेक्षा जास्त डॉक्टर पाठवले आहेत. या कामासाठी क्युबामधील डॉक्टर स्वेच्छेने जातात आणि त्यांना मिळणारे वेतनही क्युबाच्या सामान्य सरकारी डॉक्टरांपेक्षा जास्त नसतं. उलट जीवाला धोकाच जास्त.
क्युबाने इतर गरीब देशांच्या मदतीला केवळ डॉक्टर नाही तर स्वातंत्र्य सेनानीही पाठवले आहेत. १९८० च्या दशकात दक्षिण अफ्रिकेच्या वंशवादी अपार्थाईड सरकारने नामिबिया आणि अंगोलावर कब्जा करायला युद्ध पुकारलं. अमेरिका व ब्रिटनने दक्षिण अफ्रिकेला हत्यारं आणि अणुअस्त्रदेखील पुरवली होती. तेव्हा क्युबाचे ५५,००० जवान अंगोलाच्या वतीने लढायला गेले. वंशवादी सेनेचा कणा मोडण्यात मोठा यांनी हातभार लावला – आणि शेवटी दक्षिण अफ्रिकन देश अपार्थाईडमधून स्वतंत्र झाले.
क्युबा कडून सर्व विकसनशील देशांनी बरंच काही शिकायला हवं. फक्त ११०,८६० वर्ग कि.मी चा छोटासा देश. लोकसंख्या फक्त १.१३ कोटी. ऊस व तंबाखूपानं निर्यातीवर अवलंबून असलेला हा देश १९६० पासून अमेरिकेने लागू केलेल्या सागरी आणि व्यापारी वेढ्यात अडकलेला आहे. तरीही त्यांनी १०० % साक्षरता लागू केली आहे. केजी ते पदवी उच्चशिक्षण मोफत देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. जगातल्या सर्वात विकसित आरोग्य व्यवस्थांपैकी एक उभी केली आहे. चीनला कोरोनाशी लढायला मदत करणारं एक प्रमुख औषध – इंटरफेरोन आल्फा २बी – या औषधाचा शोध क्युबाने आपल्या स्वदेशी प्रयोगशाळेत १९८१ साली डेंगीशी लढण्यासाठी लावला.
क्युबाच्या या प्रगतीचं महत्वाचं कारण हे की क्युबाची आर्थिक राजकीय व्यवस्था समाजवादी आहे. अमेरिकेने, युरोपने जगातील सर्व गरीब देशांवर लादलेल्या जागतिकिकरणाच्या मॉडेलला साफ नाकारून आपला विकास केलाय. तिथल्या माणसांना या विकास प्रक्रियेत सामील करून समाजाचं नेतृत्व जनतेकडे सोपवायचा प्रयत्न केलाय आणि गेल्या ६० वर्षात अमेरिकेच्या तमाम सैनिकी आणि आर्थिक आक्रमणांना पुरून उरलाय.
ज्या देशांना क्युबाची मदत मिळाली आहे – त्या देशांच्या मंत्र्यांनी आपले आभार आणि क्युबाचं कौतुक जाहीरपणे व्यक्त केलंय परंतु जागतिक पातळीच्या, आणि विशेषतः पश्चिमी देशांच्या कॉर्पोरेट-मालकीत असलेल्या प्रसारमाध्यमांनी क्युबाच्या बातम्या लोकांसमोर आणल्या नाहीत. [कारण क्युबाचे मॉडेल जगात मानले जाणे असं कॉर्पोरेट-शाहीच्या हिताचं नाही.
क्युबाची लोककेंद्री व्यवस्था आणि आंतरराष्ट्रवादी संस्कृती ही अचानक तयार नाही झाली. क्युबाच्या स्वातंत्र्य लढ्याची आणि नंतर क्युबन समाजवादी क्रांतीची ती वैचारिक परंपरा राहिली आहे. होजे मार्टी, फ़िडेल कॅस्ट्रो, कमिलो सेनफ़ेगोस आणि सेलिया सांचेज़ या परंपरेचे पाईक होते. यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साठ वर्षात क्युबाच्या जनमानसात हा विचार रुजला आहे की आपण जे काही मिळवलंय त्यासाठी सर्व जगातल्या कष्टकऱ्यांचं देणं लागतो. क्युबन लोक मानतात की जगातल्या संसाधनांचा उपयोग सार्वजनिक कल्याणासाठी झाला पाहिजे आणि सर्वात गरीब लोकांच्या मदतीसाठी. १९७३ मध्ये क्युबाने मलेरियाला कायमचे हद्दपार केले. अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले, पण एक क्युबन डॉक्टर म्हणाला की याला तोपर्यंत अर्थ नाही, जोपर्यंत आम्ही संपूर्ण जगातून मलेरिया हद्दपार करत नाही. अशी आहे क्युबाची आंतरराष्ट्रीयवादी संस्कृती.
“एका माणसाचं आयुष्य हे सर्वात श्रीमंत माणसाच्या सर्व संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे” – क्युबाच्या सर्वात लोकप्रिय क्रांतीकारक चे गव्हेरांची ही शिकवण आज क्युबन जनता आपल्या जगण्यात, आचरणात उतरवत आहे.
लेखक – ओवेइ लाकेम्फा (५४ अफ्रिकन देशांचा संघ – OATUU चे माजी प्रमुख सचीव. नायजेरियाचे निवासी.) भाषांतर – निश्चय ( 8806966933)