सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा पोलिसांनी जिल्हयामध्ये अंमलीपदार्थ गांजा वगैरेच्या केसेस करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर एक विशेष पथक तयार करून कारवाई करण्यात आलेल्या आहेत. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या सूचनेनुसार सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केलेले आहे. या पथकाने गांजा प्रकरणात परशुराम रामफेर ठाकूर (वय- 35 वर्षे, रा. 125, रघुनाथ पुरा करंजे सातारा) या संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळालेल्या बातमीनुसार वाढेफाटा सातारा येथे एका भंगाराच्या दुकानात एका इसमाने गांजाच्या झाडांची लागवड करुन जोपासना केलेली आहे. पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे दि. 3/ 11/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने वाढेफाटा- सातारा येथील जय दुर्गामाता स्क्रॅप मर्चंट या दुकानामध्ये छापा टाकला. दुकानाच्या परिसरात लागवड करुन जोपासना केलेली “गांजा” या अंमली पदार्थाची एकुण 4 झाडे वजन 20.880 कि.ग्रॅम कि.रु. 5 लाख 22 हजाराचा माल जप्त करण्यात आला. सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं 959 / 2022 गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम 1985 चे कलम 8,20 (अ) (ब) 22(क) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाईमध्ये सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, प्रविण फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, वैभव सावंत, धीरज महाडीक, चालक संभाजी साळुंखे, फॉरेन्सीक विभागाचे पो. कॉ. राजु कुंभार व अमोल जाधव यांनी सहभाग घेतला.