नांदेड | सध्या सोशल मीडियावरून सर्रास फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्ह्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. एका महिलेला विदेशातील लोकांशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. महिलेने फेसबुकवरून विदेशी लोकांशी मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेऊन वाढदिवसानिमित्त अमेरिकेतून पार्सल पाठवल्याचे सांगून ते सोडून घेण्याच्या नावाखाली महिलेला चार लाख 26 हजार रुपयांना गंडविण्यात आले.
या प्रकरणात मांडवी पोलीस ठाण्यात अमेरीकेच्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. किनवट तालुक्यातील उमरा बाजार येथील एका महिलेची अमेरिकेतील दोघांशी फेसबुकवरून मैत्री झाली होती.फेसबुकवरून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यात मैत्रीचा गैरफायदा घेऊन अमेरिकेतील एडिट एडवर्ड आणि एका महिलेने महिलेला वाढदिवसानिमित्त 50 हजार पाउंडचे पार्सल पाठवल्याचे सांगितले.
ते पार्सल सोडवून घेण्यासाठी टॅक्स स्वरूपात महिलेने सारखणी येथील एसबीआय बँकेतून 4 लाख 26 हजार रुपये 10 ते 13 मे दरम्यान आरोपी च्या खात्यावर टाकले. आरोपीकडून त्यानंतर ही पैशाची मागणी होत होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने मांडवी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मांडवी पोलिसांनी तपास केला असता महिलेला गंडा घातल्याचे पुढे आले.