सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीच्या पाचवीला पुजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. शेरीनाल्याच्या बंधार्याजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळण्याचे थांबत नाही. एकीकडे प्रशासनाकडून कृष्णा माई स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे आता सायकलपट्टू दत्ता पाटील यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
दत्ता पाटील यांनी आयर्विन पुलावरच अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली आहे. जोपर्यंत गटारगंगा कृष्णा नदीत मिसळणे थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेरीनाल्यातील सांडपाणी धुळगावमधील शेतीला देण्यासाठी धुळगाव शेरीनाला शुध्दीकरण योजना राबविण्यात आली. पण ही योजना आता फोल ठरल्याचे चित्र आहे. कृष्णा नदीकाठी बंधारा बांधून तेथून तीन मोटारीव्दारे सांडपाणी उचलण्यात येते. पण गेल्या काही दिवसांपासून सतत मोटारी बंद पडत आहेत. त्यामुळे पाणी उपसा नियमित होत नाही. तसेच हे सांडपाणी वाहून देण्यासाठी विष्णूघाटापर्यंत टाकण्यात आली आहे. तेथून मोठी गटार काढून त्यात पाणी सोडले जाते. या ठिकाणी देखील गटार सतत फुटते.
आयर्विन पुल ते विष्णू घाट, अमरधाम घाटमार्गे संपूर्ण सांडपाणी नदीत फेसाळून मिसळत असते. आता शेरीनाल्याच्या बंधार्याजवळ गटार फुटल्याने सांडपाणी थेट कृष्णेत मिसळत आहे. त्यामुळे सांगलीकरांना हेच गटारगंगेचे पाणी प्यावे लागणार आहे. याबाबत आवाज उठवला, महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरीही त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. एकीकडे प्रशासनाकडून माझी कृष्णा माई स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे महापालिकेच्या गलथान कारभारामुळे कृष्णा नदीचे मोठे प्रदूषण होत आहे. याच्या निषेधार्थ सायकलपट्टू दत्ता पाटील यांनी अनोखे आंदोलन सोमवार पासून सुरु केले.