चक्रीवादळांच्या तडाख्याने महाबळेश्वर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत, मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तौक्ते चक्री वादळामुळे महाबळेश्वर तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. चक्री वादळांमुळे महाबळेश्वर तालुक्यांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, प्रतापगड येथील घरांचे छप्पर उडणे, अंगणवाडी शाळांचे इमारतींचे नुकसान, पाणी पुरवठा बंद पडणे, वीज गायब होणे, नदीनाल्यांना अचानक पूर येणे, गुरांचे गोठे, पाॅलिहाऊस, संरक्षक भिती पडणे अशा घटनांच्या मालिकांमुळे तालुक्यांतील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच ठिकाणी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, कुठेही जीवित हानी झालेली नाही.

मुसळधार पावसामुळे वीजवितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब व विद्युत तारा पडल्यामुळे संपूर्ण तालूका अंधारात बुडाला आहे. खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीजवितरण विभागाचे कर्मचारी तारेवरची कसरत करत आहेत. तरी देखील सोमवारी रात्री पर्यंत वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता. शनिवार पासून महाबळेश्वर पाचगणी सह अनेक गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. वीज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. महाबळेश्वर पालिकेने टॅंकर भरुन ठेवले असून मागणी केल्यास पुरवण्यासाठी तयारी करुन ठेवली आहे.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/146522527395024

अचानक आलेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोमवार दुपार नंतर पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी वादळी वारे काही कमी झाले नाही. त्या मुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णालेक पाणीपातळीत वाढ झाली आहे. लिंगमळा धबधब्यावरून ही कोसळणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन मे महिन्यात लिंगमळा धबधब्या वरून कोसळणार जलप्रपाताचे दृश्य मोठे विलोभनीय दिसत आहे.

Leave a Comment