सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात नवीन आरटीओ चौकात चहाच्या टपरीवर सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने टाकीने अचानक पेट घेतला. या लागलेल्या आगीत टपरीवरील साहित्याचे नुकसान झाले आहे. सतर्क नागरिकांच्यामुळे मोठा अनर्थ घडला नाही. तसेच कोणतीही जिवितहानी झालेली नाही. या आगीत चहा टपरी चालकांचे लाखभर रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीत मोबाईल फोनसह रोख रक्कम व टपरीवरील साहित्य जळून खाक झाले.
घटनास्थळावरील माहिती अशी, सातारा शहरात असलेल्या नवीन आरटीओ चाैकात चहाची टपरी आहे. सकाळी नेहमीप्रमाणे आरटीओ आॅफिसला येणारे लोक येथे चहा घेण्यासाठी थांबले होते.यावेळी चहाच्या टपरीवरील सिलेंडरच्या टाकीला गॅस गळती झाली. सुदैवाने तेथे असलेल्या लोकांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
गॅस गळती सुरू झाल्याचे दिसताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशामक जवानांनी आग विझवत पेटलेला सिलेंडर बाजूला करत आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. आग लागल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.