उद्यापासून दररोज करा दिल्ली, मुंबई, हैद्राबादला ‘हवाई सफर’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी विमान 1 मार्चपासून दररोज उड्डान घेणार आहे. त्यामुळे या तीन शहरांना पुन्हा एकदा दररोज विमान प्रवास करता येणार आहे.

औरंगाबादहुन सध्या एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. दिल्ली, मुंबई विमानसेवा नियमित सुरू आहे. मात्र इंडिगोच्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद विमान सेवांना कोरोनाच्या तिसरा लाटेचा फटका बसला. तिसऱ्या लाटेमुळे जानेवारीत विमान प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे इंडिगोची सकाळी दिल्लीसाठी सुरू असलेली विमानसेवा बंद झाली. तर सायंकाळची दिल्ली, मुंबई, हैदराबाद विमानसेवाही विस्कळीत झाली.

परंतु, फेब्रुवारी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच 16 फेब्रुवारीपासून इंडिगोचे दिल्ली विमान दररोज उड्डाण घेत आहे. मुंबई आणि हैदराबाद साठी एक दिवसाआड विमानसेवा उपलब्ध होती. आता या तीनही शहरांसाठी उद्यापासून इंडिगोचे विमान उड्डाण घेईल.

औरंगाबाद-बेंगलोर विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी प्रयत्न आहेत. लवकरच ही विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर अहमदाबाद विमानसेवा जूनपर्यंत पूर्ववत होईल अशी अपेक्षा असल्याचे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले.