कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जोपर्यंत धरणग्रस्त व पुरग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे सोडवून त्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत संभाजी ब्रिगेड लढतच राहणार आहे. जनतेच्या समस्या व प्रश्न घेवून लढणे आणि जिंकणे एवढेच आम्हाला माहिती आहे. या लढ्यातही आम्ही चार पाऊले तुमच्या पुढेच असणार आहे. पण तुम्ही साथ सोडू नका’, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केले.
ढेबेवाडी खोऱ्यातील जिंती विभागातील वाड्यावस्त्यात डोंगर व जमीन खचून दरडी कोसळल्याने निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे विविध प्रश्नही समजावून घेतले. तेथील दरडीग्रस्तांबरोबरच मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसन प्रश्नी लवकरच मंत्रालयाचा दरवाजा ठोठावण्याचे नियोजन संभाजी ब्रिगेडने केल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे,संघटक श्रीकांत गिरी,दत्ता कोळेकर आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सुहास राणे म्हणाले,’काही दिवसांपूर्वीच आम्ही प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत घेवून येथे आलेलो होतो. त्यावेळी संवाद साधून प्रश्न पुढे नेण्यासाठी परत इकडे येवू असा शब्द तुम्हाला दिलेला होता. तोच विश्वास घेवून आता परत आलोय, लवकरच मंत्रालयाचे दरवाजे ठोठावून न्याय मिळेपर्यंत लढत राहू’. धोकादायक दरडींमुळे जिंती येथील माध्यमिक विद्यालयात आश्रय घेतलेल्या नागरिकांनी यावेळी विविध प्रश्न व समस्या मांडून सुरक्षित ठिकाणी तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी केली.