पाटण : सकलेन मुलाणी
दोन दिवस झालेल्या पाऊसाने पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करुन मदत मिळावी, अशी मागणी करीत पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी रास्तारोको आंदोलन केले.
मुसळधार पावसामुळे पाटण तसेच कराड तालुक्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अगोदरच कर्ज काढून पिकांना खतपुरवठा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामध्ये आता अतिवृष्टीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी नेते विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कराड-चिपळूण महामार्ग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत काही काळ वाहने रोखुन धरली.
नुकसानीमुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अचानकपणे रस्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनामुळे काहीकाळ महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे पोलिसांनी शेतकरी नेते विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.